मी बाप्पा बोलतोय
प्रिय भक्तांनो,
प्रत्येक वर्षी जेव्हा तुम्ही मला आपल्या घरी, गल्लीत, मंडपात आणता तेव्हा माझे हृदय आनंदाने भरून जाते. घराघरांतून येणारा "गणपती बाप्पा मोरया" हा जयघोष होताच मला तुमच्या प्रेमाची प्रचिती येते.
मी मूर्तीमध्ये असलो तरी प्रत्यक्षात तुमच्या हृदयात वास करतो. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यात, छोट्या मुलांच्या किलबिलाटात, स्त्रियांच्या आरतीत, तरुणांच्या उत्साहात आणि वृद्धांच्या भक्तीत मी स्वतःला अनुभवतो. दहा दिवसात तुम्ही मला फुलं, नैवेद्य, मोदक अर्पण करता; पण मला खरा आनंद तुमच्या हृदयातील श्रद्धा, निरागस प्रेम आणि निर्मळ भावनेतून मिळतो. तुमची आरती करताना तुमच्या डोळ्यांत चमकणारे भाव पाहून मला वाटते की, माझे आगमन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले..
मला प्रेमाने घरी आणता, पण कधी कधी त्या आनंदोत्सवात विसरता की माझे खरे रूप म्हणजे ज्ञान, सद्गुण, शांतता आणि समत्व. दगडामध्ये, मातीमध्ये किंवा शाडूमध्ये मी मर्यादित नाही; मी सृष्टीच्या कणाकणात आहे.मी तुमच्या प्रार्थना ऐकतो, अश्रू पाहतो, तुमच्या मनातील भीती आणि चिंता जाणतो, जोडलेला प्रत्येक हात आणि आणि त्यामाघची भावना ही मला ठाऊक आहे.
कधी मी बाल गणेश मंडळात चिमुकल्यांनसोबत,दगडूशेठ, भाऊसाहेब रंगारी लालबागच्या राजा,परेलचा राजा, गणेशगल्ली, कसबा तर कधी वयोवृद्ध आजीच्या झोपडीत स्थानापन्न झालेला असतो. भाविक गरीब असो अथवा श्रीमंत मी कधीही फरक केलेला नाही पण सध्याच्या काळात बऱ्याच गणेश मंडळात दर्शनासाठी, मला पाहण्यासाठी व्हीआयपी नावाची पद्धत दिसत आहे आणि याचा परिणाम दिसतो तो माझ्यावर असणाऱ्या भक्ती आणि प्रेमावर. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लालबागचा राजा गणेश मंडळ. गेली ९२ वर्ष झालं हे मंडळ माझी सेवा करत आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे कारण जी उत्सुकता, प्रेम,भक्ती-भाव हे करतात ते पाहून कोणीही गहिवरून जाईल तसा मी ही....पण मुद्दा येतो तो दर्शनासाठी होणाऱ्या गोंधळाचा, भांडणाचा, आणि माझ्या दारात येऊन रडणाऱ्या भाविकांचा. एका बाजूस अभिनेते, राजकीय व्यक्ती, व्यापारी आणि एका बाजूस धक्काबुक्की, अपशब्द आणि ताटकळत असलेला सर्वसामान्य भाविक, भक्ती मात्र दोघांची सारखीच फरक फक्त प्रसिद्धी, पैसा आणि ओळखीचा..
भक्त: आज अनंत चतुर्दशी नंतरचा दिवस म्हणजे बऱ्याच गावी बाप्पाचं विसर्जन त्याच हर्षोल्लशाने होतं असतं मग त्यात नवसाला पावणारा आणि जगभर प्रसिद्ध असा लालबागचा राजा हा मानाचा..
खरंतर दुपारपर्यंत राजाचं विसर्जन व्हायला हवं होतं परंतु ग्रहण असल्यामुळे कदाचित समुद्राला भरती आली असावी मग काय राजाची बोट फसली, राजा एकटा 8 तास पाण्यात बसून पण आजूबाजूचे भक्त मात्र एकीकडे आनंद गगनात मावेना कारण धक्काबुक्की न करता सुंदर दर्शन होत होतं आणि चिंता याची की मूर्ती काय बोटावर जायला तयार नव्हती मग याला राजाची परत जायची इच्छा नसावी, नाराजी म्हणावी अथवा नियतीचा खेळ...
देवा तुझी किमया तूच जाणो!!
सुखकर्ता, दु:खहर्ता...घडेल त्याप्रमाणे प्रत्येकाच्या सुखाचं कारण आणि दुःखाचं हरण करणं माझं कर्तव्य आहे परंतु जर कोणी माझ्या भाविकास असभ्य वर्तणूक करत असेल तर माझं देखील मन चिंतेत राहतं!
मला मनसोक्त पाहण्याचा, दर्शन घ्यायचा आणि आपलं गाऱ्हाणे माझ्याजवळ मांडण्याचा हक्क प्रत्येक भक्तास आहे आणि त्यात विघ्न म्हणजे ही व्हीआयपी पद्धत, हा नियम लवकरच मोडीत यावा म्हणजे माझ्या दरबारातून कोणीही निराश आणि हतबल होऊन जाणार नाही!
मला मोदक जितके प्रिय आहेत तितकाच आनंद मला मिळतो जेव्हा माझ्या भक्ताच्या चेहऱ्यावर भाव पाहून आणि नामस्मरणाचा गजर ऐकून!
माझ्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, शांती, प्रेम आणि समृद्धी नांदो.
विसर्जनाच्या दिवशी दिलेला निरोप हा विरहाचा नाही, तर पुन्हा मी येईल या आशेचा आहे.
कारण मी तुमच्यासोबत सदैव आहे—तुमच्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक प्रार्थनेत.
पुन्हा भेटू, लवकरच तोवर माझं प्रेम, माझे आशीर्वाद आणि माझं अस्तित्व कायम सर्वांसोबत!!
आपलाच
केशव प्रदिपराव बडवे
Comments